पुतिनीझम
'पुतिन' वाचलं. सध्याच्या भाषेत सांगायचं तर एखादी डिटेक्टिव्ह किंवा स्पाय सीरीज पाहताना एपिसोडगणिक जसं कुतुहल वाढत जातं आणि क्रूरता, थरार, डावपेच, मुत्सद्देगिरी, राजकारण यांचे टोकाचे पैलू दिसतात, तसं या पुस्तकाचं प्रत्येक पान उलटताना वाटतं.
पुस्तकातील हा थरार आपल्यातल्या संवदेनशील मनाला नको वाटतो, पण वाचनीय आहे. आपण एकदा वाचून ठेवायला हवं. कारण आज-ना-उद्या आपल्या आजूबाजूला हा थरार घडताना दिसणारच नाही, याची शाश्वती वर्तमान स्थितीवरून देता येत नाही.
सत्तेसाठी माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात आणि त्याच सत्तेला आव्हान देण्यासाठीही माणसं किती धाडस करू शकतात, या दोन्ही गुणांची माणसं या पुस्तकात सापडतात. इथं सत्तेसाठी वाट्टेल त्याला नेस्तनाबूत करणारा पुतिनही आहे आणि क्रूर सत्तेला नागडं करण्यासाठी जीवाची बाजी लावणारी अॅना पोलित्कोवस्काया नावाची पत्रकार सुद्धा आहे. एखाद्या सिनेमात शोभावा असा पुतिनचा दोन-अडीच दशकांचा प्रवास.
'पुतिनचा प्रवास दोन-अडीच दशकांचा' असं म्हटलं असलं तरी, रशियातल्या या अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ आहेत आधीच्या काही शतकांमध्ये. गिरीश कुबेर आपल्याला त्या आधीच्या शतकांचीही ओळख करून देतात. सत्तेसाठी रशियाच्या भूमीवर खेळलेल्या रक्तरंजित इतिहासाची एक उजळणी करून देतात आणि मग येतात 'पुतिनीझम'वर.
केजीबीचा हेर, क्रेमलिनमधला अधिकारी, एका शहराचा महापौर, मग काही महत्त्वाची पदं, मग पंतप्रधानपद आणि मग थेट अध्यक्षपदी... केवळ अध्यक्षपदीच नव्हे, तर सर्वसत्ताधीश आणि सर्वंकशसत्ताधीश बनण्याचं ते क्रूर स्वप्न.
मग या स्वप्नात अडथळा ठरणारा कुणी भर रस्त्यात कापला जातो, कुणी हार्ट अटॅकने जातो, कुणाला कधीही उपचार न मिळणारा आजार होतो, कुणाच्या रक्तात कुठलेतरी रसायन शिरतं, कुणाचा मृतदेह बंद बाथरूममध्ये गळ्याला दोरी बांधलेल्या अवस्थेत सापडतं, तर कुणाचा घरातच गोळीबारात मृत्यू होतो.
हे केवळ सर्वंकश सत्तेला विरोध करणाऱ्यांचेच हाल असं नव्हे, तर ज्यांनी मदत केली, ज्यांनी इथवर पोहोचायला पैसा पुरवला, माध्यमांची फौज मागे उभी केली, त्यांचीही यातून सुटका नसते. 'काम खतम, बात खतम' असं आपण म्हणतो, मात्र रशियात शेवटचे दोन शब्द बदलतात आणि त्याचं होतं - 'काम खतम, जान खतम'.
सत्तेत राहण्यासाठी खेळलेले डावपेच आणि उगारलेले सूड, हे आपल्याला अगदीच परिचित वाटू लागतात. का ते वेगळं सांगायला नको. पण यातून आपण काही शिकू, किमान शहाणे होऊ, एवढी अपेक्षा या पुस्तक वाचणाऱ्यांकडून आहे. पुस्तकात व्यक्त केली नाहीय, पण अधूनमधून तसं सांगण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न कुबेरांनी नक्कीच केलाय.
पुतिन हे प्रचंड स्वप्रेमात बुडालेले आहेत. त्यांना स्वत:ची प्रतिमा लोकांसमोर चुकीची रंगवलेली आवडत नाही, असं कुबेर सांगतात. जनमत आपल्या विरोधात जात असल्याचं त्यांना दिसलं की, ते चेचण्यांच्या बंडाचा मुद्दा पुढे करत रशियनांचं देशप्रेम जागं करतात. लोकही भुलतात. चेचण्या झालं की क्रीमिया आहेच.
क्रीमियाबद्दलच सांगताना कुबेरांनी अशा नेत्यांबद्दल नोंदवलेलं मत फारच विचार करण्याजोग आहे. भारतीयांनी तर अधिकच. कुबेर लिहितात, "सर्वसामान्य नागरिकांना दांडगाई करणारे नेते आवडतात. त्यात अशा नेत्यांकडूनही हे सर्वकाही देशासाठी करत असल्याचा मुलामा दिला जात असेल, तर नेत्याच्या प्रतिमेला चांगलीच झळाली येते. लोकांना असा नेता आवडतो. आपल्याला जे जमत नाही, ते या अशा नेत्यांनी केल्यावर नागरिक सुखावतात."
अर्थात, सर्व नागरिकांच्या मानसिकतेचं कुबेरांनी यात सरसकीटकरण केलं नाहीय. अपवाद वगळलेतच. मात्र, या मानसिकतेला रशियाच्या सीमांचं बंधन नाही, हे सांगण्याची गरज नाही. असो.
अगदी परवा परवा घडलेलं आणि अजूनही न उलगडलेलं अॅलेक्सी नवाल्नी यांचं प्रकरण हे पुतिन काय चिज आहे, हे कळायला (किंवा न कळायला) ताजं उदाहरण.
एखाद्या हुकूमशाही प्रवृत्तीचा किंवा निरंकुश सत्तेच्या भुकेल्या असणाऱ्या क्रूर माणसाचा थरारक प्रवास या पुस्तकातून उलगडलाय. हे रशियाचं आहे म्हणून कानाडोळा करू नका, कमी-अधिक प्रमाणात आपणही याच्याशी संबंधित असू किंवा आपल्यालाही ते लागू होतं, या हेतूने वाचा. तुमचा हेतू साध्य होईल, किमान आजच्या राजकीय उलाथापलाथींच्या पार्श्वभूमीवर तरी.
...
नामदेव काटकर
संपर्क : namdev.katkar@gmail.com
Comments
Post a Comment