पुष्पाबाई नावाचं विद्यापीठ

असं होत राहतं बऱ्याचदा. म्हणजे एखादं पुस्तक वाचलं की सगळ्यांना सांगत सुटायचं. सुचवत राहायचं. नदीष्ट, रारांग ढांग, ऋतुचक्र, गोष्ट छोटी डोंगराएवढी अशा बऱ्याच पुस्तकांबाबत माझं नेहमी होत आलंय. आता तेच पुष्पाबाईंच्या पुस्तकाबाबत झालंय.

मेधा कुलकर्णी यांनी पुष्पा भावे यांच्याशी संवाद साधून 'लढे आणि तिढे... चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी' नावाचं सुंदर पुस्तक लिहिलंय. आईनं आजीशी गप्पांमधून पाच-साडेपाच दशकांचा सर्वांगानं समतोल साधणारा वैचारिक पट आपल्यासमोर मांडावा, असं हे पुस्तक.

खरंतर असं क्वचित होतं की, एखादं पुस्तक वाचल्यानंतर आपली आधीपासून असलेली समज थोडी वाढते आणि त्या वाचनातून कळलेल्या काही गोष्टींमुळे विचारांमध्ये काही बदलही करावे वाटतात. पुष्पाबाईंची विविध मुद्द्यांवरील भूमिका, मतं, विश्लेषणं, पाहण्याचा दृष्टिकोन वाचल्यानंतर असा बदल माझ्यात मोठ्या प्रमाणात झाला, असं मी प्रामाणिकपणे नमूद करतो. आपण किती त्रोटक किंवा संकुचित नजरेतून बऱ्याच गोष्टी पाहत असतो, पण त्या गोष्टींना किती पदर असू शकतात, हे विशेषत: जाणवलं. फार कमी पुस्तकांवेळी असं होतं, हे मात्र अगदी खरं.

पुष्पाबाईंच्याच म्हणण्याप्रमाणे त्या काही पूर्णवेळ कार्यकर्त्या नव्हत्या. मुंबईतील रुईया महाविद्यालयात त्यांनी निवृत्तीपर्यंत प्राध्यापिका म्हणून काम केलं. पण त्या जरी अशा म्हणत असल्या तरी त्या कुठे कुठे असायच्या! सामाजिक-राजकीय चळवळी, भाषा-साहित्याच्या चळवळी, स्त्रियांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न अशा नाना ठिकाणी बाई कुठल्या ना कुठल्या भूमिकेत असायच्याच. या प्रत्येक क्षेत्रातील पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी त्या आधार बनून उभ्या राहत होत्या.

परवा त्या गेल्या तेव्हा बऱ्याच माध्यमांनी केवळ रमेश किणी प्रकरणापुरते त्यांना आठवलं. ते सहाजिक होतं. तो लढा मोठा धाडसी होता, हे मान्यच. पण त्या पलिकडे बाई आहेत. महाराष्ट्राचा जीव कशात आहेत, तो कसा आहे, तो जीव जगण्यासाठी त्याची गरज काय आहे, त्यात बदल काय करायला हवेत, अशा असंख्य प्रश्नांची जाण असलेल्या बाई होत्या. हे पुस्तक वाचताना वाक्यगणिक ते जाणवतही राहतं.

त्या हातचं राखून काही बोलत नाहीत. पुलंचं कौतुक करतानाच त्यांच्यासोबतचे अनुभव जसेच्या तसे मांडतात. सामाजिक कृती निधीला मदत करण्याऐवजी स्वत: व्यक्तिगत पातळीवर मी इतरत्र मदत करतो, ही पुलंची भूमिका त्या सांगताना भीत नाहीत. तसंच, पुलंची पत्नी सुनिता देशपांडे यांना कळलेला स्त्रीवाद फारच संकुचित होता, असं म्हणायलाही त्या बिथरत नाहीत. खरंतर आजच्या घडीला पुलंचं गारूड किती हे वेगळं सांगायला नको. तरीही बाई ते ठामपणे मांडतात. खरं मांडण्याचा-बोलण्याचा आग्रह हेच तर त्यांच्या संपूर्ण जीवनाचं तत्त्व होतं. मुळात इतकं ठाम असणं, हे फार क्वचित घडत असावं. बाईंना ते जमत होतं.

सामाजिक कृतज्ञता निधीचं त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या सोबतीनं केलेलं काम महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, किंबहुना विसरायलाही नको. या निधीच्या कामासाठी त्यांनी राज्यभर केलेले दौरे, तेव्हाचे अनुभव हे सारंच वाचनीय आहे. यासोबतच डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू, निळू फुले, अशोक जैन, अनंत भावे, मृणाल गोरे अशा बऱ्याच जणांच्या आठवणींना बाईंनी या पुस्तकातून उजाळा दिलाय.

मृणाल गोरेंच्या आठवणी सांगताना त्यांच्या शब्दांमध्ये एकप्रकारचा धाडसीपणा जाणवतो. कदाचित तो मृणाल गोरे नावाच्या खमक्या बाईबद्दल सांगत असतात म्हणूनही असेल. पण आणीबाणीच्या काळातल्या त्या गोष्टी वाचताना खरंच बाईंना पुढे रमेश किणी प्रकरणातही आलेला धाडसीपणा दिसतो, तेव्हा त्यांची मृणालताईंसारख्यांशी असलेली सोबत लक्षात येते.

त्या कधीच कुणासमोर नमल्या नाहीत. सेना-भाजप युतीच्या सत्तेच्या काळातच शिवसेनेसारख्या तेव्हा अधिक आक्रमक असलेल्या पक्षासमोर दोन हात करायला त्या डगमगल्या नाहीत. राज ठाकरेंना कोर्टापर्यंत नेण्यासाठी त्या झटल्या. मात्र, भ्रष्ट व्यवस्थेनं त्यांना मागे हटवलं. तो काही त्यांचा पराभव नव्हता. तो या व्यवस्थेचा पराभव होता. पण रमेश किणी प्रकरणावेळचा तो थरार बाईंच्या शब्दात ऐकताना खरंच भारावून जायला होतं. आजही कुणी इतकं धाडस करेल, असं वाटत नाही. पण सेनेच्या ऐन सत्तेच्या काळात बाईंनी ते दाखवलं, ही किती मोठी गोष्ट होती.

शिवसेनेचं बेगडी मराठीप्रेम सांगताना, त्या भाराभर गोष्टी सांगत नाहीत. त्या त्यांचाच एक डोळ्यांदेखतचा अनुभव सांगतात. 

शिवसेनेनं रुईया महाविद्यालयात मराठी विभाग सुरू करायला विरोध केला होता. 'मी नथुराम बोलतोय..' लिहिणारे प्रदीप दळवी हे तेव्हा सेनेचे पदाधिकारी होते आणि त्यांनी रुईयासमोर धरणं धरलं होतं, असं त्या बिनधास्तपणे सांगतात आणि सेनेच्या बेगडी मराठीप्रेमाबाबत स्पष्ट बोलतात. 

बाळासाहेब ठाकरेंमुळे महाराष्ट्राचं सामाजिक-सांस्कृतिक नुकसान सांगताना, ते अशा व्यक्तींना 'Megalomania' असा नेमका शब्दही वापरतात. या शब्दाचा अर्थ आहे, स्वत:च्या भ्रामक श्रेष्ठत्वाचा उन्माद करणं. 

शिक्षण, साहित्य, भाषा, नाटक-सिनेमा, आंबेडकरी विचार यांबाबतही बाई किती सजग होत्या. या सगळ्यांबाबत बोलताना त्यांची मांडणी किती समतोल साधणारी वाटते! कुठेही एकांगी नव्हे की कुठेही द्वेषमूलक नव्हे, मानवतेला केंद्रबिंदू मानून त्या भोवती गुंफलेली संपूर्ण विचारधारा आपल्याला प्रेमात पाडते. आदर्शवत वाटणारं हे व्रतस्थ जगणं बाई वास्तवात जगल्या.

व्यक्तिगत आयुष्याबाबत त्या फारच कमी बोलल्यात. पण तरीही काही ठिकाणी त्या फार हळव्या झालेल्या भासतात. विशेषत: एकामागोमाग जवळच्या व्यक्तींचं निघून जाणं. त्या क्षणी त्या किती खंबीरपणे वागल्या, राहिल्या, याची प्रचिती मात्र येते.

विचारांमधील सुस्पष्टता, तळागाळातील लोकांप्रती तळमळ, स्त्रियांच्या प्रश्नांची नेमकी जाण, भाषा-शिक्षणाबाबत सजगता, सामाजिक कार्यातला पुढाकार, राजकीय प्रश्नांप्रती स्पष्टवक्तेपणा अशा कितीतरी गोष्टींनी बाईंसोबतचा हा संवाद फुललेला आहे. 

मेधा कुलकर्णी या पुष्पाबाईंच्या रुईया महाविद्यालयातील विद्यार्थिनी. त्यामुळे असेल कदाचित, किंवा पुढे बाईंना अभिमानच वाटेल असं कार्य मेधाताईही करत असल्यानं असेल, बाई मेधाताईंशी किती मनमोकळ्या बोलल्या आहेत, कुठलंही हातचं न राखता! दोघींमधला हा वैचारिक संवाद खरंच वाचनीय आहे.

थोडी व्यक्तिगत आठवण सांगायची, तर बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची मला एकदाच संधी मिळाली. तीन-एक वर्षे झाले असावेत. गणेश विसपुतेंसारख्या काही लेखकमंडळींनी रुईया महाविद्यालयात आंतरभारतीतर्फे समारंभ भरवला होता. तेव्हा कुमार केतकरांना ऐकण्यासाठी म्हणून तिथं गेलो होतो. तेव्हा पुष्पाबाई आल्या होत्या.

मला आठवतंय तेव्हाचं त्यांचं एक वाक्य. भाषणात त्या बोलल्या, 'महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता. महाराष्ट्रात त्या त्या काळात काही अशा व्यक्ती जन्मल्या, ज्यांनी पुरोगामी विचारांची कास धरली आणि तो विचार पसरवला. अख्खाच्या अख्खा महाराष्ट्र पुरोगामी वगैरे म्हणणं म्हणजे आपण आपल्याच समस्यांना पांघरून घालण्यासारखं आहे.' मला हे अगदी पटलं होतं. असो. 

या पुस्तकावर लिहिताने हे आठवलं. या पुस्तकाची प्रतिक्रिया मेधाताईंना कळवली, तेव्हा त्या म्हणाल्या, "तुझ्यासारख्यांचे प्रतिसाद आले की पुष्पाबाईंनी अनुभवलेल्या, निरखलेल्या काळाचं हे डॉक्युमेंटेशन सफल झाल्यासारखं वाटतं. या प्रतिक्रिया ऐकायला बाई हव्या होत्या." 

खरंच आहे मेधाताईंचं. आज बाई हव्या होत्या. या संवादातल्या कित्येक गोष्टींवर त्यांच्याशी आणखी गप्पा मारता आल्या असत्या!

...

नामदेव काटकर

संपर्क : namdev.katkar@gmail.com

Comments

Popular posts from this blog

माझ्या आईची गोष्ट

द ग्रेट रिप्रेशन

ट्रोलिंगचा पर्दाफाश