फ्रॅक्चर्ड फ्रिडम
या पुस्तकाच्या 229 व्या पानावर आल्बेर काम्यूचं एक वाक्य आहे. ते म्हणजे - 'The only way to deal with an unfree world is to become so absolutely free that your very existence is an act of rebellion.'
कोबाड गांधी यांचं आयुष्य 'वाचताना' जाणवलं, की हे वाक्य कोबाड गांधी शब्दश: जगले.
मी फेसबुकवरून बऱ्याचदा कोबाड गांधी यांचा वेगवेगळ्या निमित्तानं परिचय करून दिलाय. तुरुंगातून सुटले तेव्हा, त्यांचं पुस्तक येणार तेव्हा आणि काही दिवसांपूर्वी पुस्तक प्रकाशित झाल्यावरही. त्या त्या वेळी अनेकांनी कोबाड गांधी यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली. कुतुहल व्यक्त केलं.
कोबाड गांधी यांचं पुस्तक अखेर प्रकाशित झालंय - 'Fractured Freedom'.
मला इतकी उत्सुकता होती की, प्री-बुकिंग करून, प्रकाशित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मिळवलं आणि चार दिवसात वाचून काढलं. आतापर्यंत तुटक-तुटक बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं, पण तरीही त्यांच्याबद्दल सलग वाचण्याची उत्सुकता प्रचंड होती. या पुस्तकानं ती पूर्ण केली.
ह्युमन टच असलेल्या, किंवा लीगल सिस्टमवर भाष्य करणाऱ्या, किंवा रिव्हॉल्युशनरी कार्यकर्त्याचं जीवनपट मांडणाऱ्या, सिनेमाचं कथानक फिकं पडावं असं कोबाड गांधी यांचं आयुष्य. तसं खरंतर 'चक्रव्यूह'मध्ये प्रकाश झा यांनी ओम पुरींच्या माध्यमातून कोबाड गांधींच्या जीवनावर छोटासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोबाड गांधींचं खरं आयुष्य 'Truth is stranger than fiction' म्हणतात ना, तसं आहे हे.
काय आयुष्य आहे या माणसाचं, तर दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू पारशी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. वडील ग्लॅक्सो या जगप्रसिद्ध कंपनीचे संचालक. देहरादूनच्या डून स्कूलमध्ये शिकतो. संजय गांधी, कमलनाथ, नवीन पटनायक हे त्यांचे वर्गमित्र.
नंतर मुंबईत सेंट झेवियर्समध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर कोबाड गांधी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये जातात. चार्टर्ड अकाऊंटन्सी शिकतात. उच्चपदावर नोकरी लागण्याची हमी घेऊनच भारतात परततात. वडील ग्लॅक्सोचे डायरेक्टर असल्यानं तशीही नोकरी सहज लागण्याची स्थिती होती.
पण लंडनमध्ये घडलेल्या एका घटनेनं या माणसाचं आयुष्यच बदललं. साऊथ एशियन विद्यार्थ्यांना तिथं वर्णद्वेषावरून त्रास दिला गेला आणि त्याचा विरोध म्हणून तारूण्यात असलेल्या कोबाड गांधींनी तिथल्या साऊथ एशियनांच्या वस्त्यांमध्ये निदर्शनं केली. परिणामी तीन महिन्यांचा तुरुंगवास घडला.
कोबाड गांधी या पुस्तकात सांगतात, वर्णद्वेषाचं स्तोम आणि त्याला चिकटलेली वसाहातिक मानसिकता यावर लंडनमध्ये बरंच वाचलं. मला त्याचं उत्तर मार्क्सवादात सापडलं. मी मार्क्सवाद वाचत गेलो आणि त्याबाबत सहानुभूती वाढत गेली.
कोबाड मुंबईत परतले आणि वडिलांच्या ओळखीवर सहज लागू शकत असलेली नोकरी न करता, ते धारावी फिरले. तिथे काम करू लागले. वरळी नाका येथील मायानगरमधील लोकांचे प्रश्न जाणून घेऊ लागले आणि त्यांच्यासाठी भांडू लागले.
हा सर्व काळ कधीचा, तर 1972-73 चा. म्हणजे, याच दरम्यान महाराष्ट्रात दलित पँथर आकार घेत होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव काळा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला गेला होता. या काळात विद्रोही विचारांचं वारं जोमानं वाहत होतं. त्यात मुंबईतल्या दलित वस्त्यांमध्ये दिवसभर फिरणारा, संवेदनशील कोबाड गांधी हा तरुण विद्रोही विचारांकडे वळला नसता, तरच नवल!
पुढे ते PRAYOM म्हणजे प्रोग्रेसिव्ह युथ मूव्हमेंटशी जोडले गेले. जनशक्तीशी संबंधित ही संघटना होती. यातून कोबाड गांधी साम्यवादी विचारांकडे वळले आणि साम्यवादानं भारावूनही गेले. पण त्यांना इथलं वास्तव माहित होतं.
मुंबई सोडून ते आणि त्यांची जोडीदार अनुराधा गांधी नागपुरात गेले. तिथं शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी आवाज उठवू लागले. वरळी सी फेसला अलिशान घर असलेले कोबाड गांधी अत्यंत अडीचशे-तीनशे स्केअर फूटाच्या घरात राहू लागले. विचारांसाठी त्यांनी केलेला हा त्याग होता.
पण आधी म्हटलं तसं, त्यांना इथल्या वास्तवाची जाण होती. म्हणूनच, ते सत्तरीच्या दशकातील साम्यवादी वर्तुळाचं जातवास्तवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगतात, तो आजही तितकचा लागू होतो असं म्हणायला काही हरकत नाही.
कोबाड गांधी म्हणतात - 'At that time caste question was considered by all varieties of Marxists as anathema, a diversion from class question, which was bedrock of Marxist belief.'
स्वत: या वर्तुळात असताना त्यांनी केलेलं हे विश्लेषण आहे. मात्र, कोबाड गांधी पुढे नमूद करतात की, इथल्या वास्तावाल आंबेडकर हे उत्तर आहे. आंबेडकरांनंतर काहीसे दुर्लक्षित झालेल्या दलितांच्या प्रश्नांना दलित पँथरनं खऱ्या अर्थानं राजकीय अजेंड्यावर नेले, असं कोबाड गांधी म्हणतात.
मला या माणसाचं कौतुक यासाठी वाटतं की, स्वत: साम्यवादी विचारांचे असताना, आणि विशेषत: भारतातील साम्यावादी जातवास्तवाकडे कानाडोळा करणारे चिवट असताना, कोबाड गांधी यांनी जातवास्तव मान्य करून, त्यावरील आंबेडकरांची मांडणी समोर ठेवली. या पुस्तकात याच अनुषंगाने कॉ. शरद पाटील यांचा उल्लेख येतो.
1972-73 पासून पुढे 40 वर्षे शोषित-वंचितांच्या न्याय्यहक्कांसाठी रानोरानी भटकणाऱ्या कोबाड गांधींना 2008 साली दिल्लीत अटक झाली आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल झाला. देशातील सहा राज्यांमधील सात तुरुंगांमध्ये त्यांना बंदिस्त राहावं लागलं. दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये सर्वाधिक काळ म्हणजे जवळपास सहा-सात वर्षे ते राहिले.
2019 च्या ऑक्टोबरमध्ये ते तुरुंगातून बाहेर आले. अजूनही खटले सुरूच आहेत. आता त्यांचं वयही झालंय आणि बऱ्याच आजारांनीही घेरलंय.
ते त्यांच्यावरील एक एक करत गुन्ह्यांमधून बाहर पडत आहेत. देशभरात एकूण 18 खटले त्यांच्यावर सुरु आहेत. या खटल्यांच्या निमित्ताने 10 वर्षांच्या तुरुंगातील काळात त्यांना आलेले विविध अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडलेत.
तिहारमधील कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवी वेदना सांगताना, ते अफजल गुरुपासून सुधींद्र कुलकर्णींपर्यंत त्यांच्या तुरुंगातील सहकैद्यांबाबतचे अनुभव सांगताना, त्यांची निरीक्षण क्षमता कमालीची कौतुकास्पद वाटते. झारखंडमधील तुरुंग असो, आंध्र प्रदेशमधील असो वा आणखी कुठलं राज्यातील तुरुंगात असो, त्यांनी तेथील स्थिती सुद्धा या पुस्तकात अगदी सखोल सांगितलीय.
बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपातून 10 वर्षे तुरुंगात घालवलेल्या या अत्यंत हुशार माणसानं तुरुंगातून पाहिलेलं जग, तिथल्या कैद्यांचं भावविश्व, एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात शिफ्ट करताना प्रशासनाचा हलगर्जीपणा, कोर्टाची दिवसेंदिवस चालणारी प्रक्रिया... आणि या सगळ्यात त्यांना आधार देणारे कुटुंबीय, वकील, मानवाधिकार कार्यकर्ते, या सगळ्यांचा उल्लेख पानापानावर येतो.
कोबाड गांधी भावनिक होतात, ते अनुराधा गांधी यांच्याबद्दल सांगताना. आदर आणि प्रेम या दोन्ही भावना त्यांच्या शब्दातून दिसतात. अनुराधा गांधी यांचं निधन सुद्ध शोषित-वंचितांसाठी काम करतानाच झालं. त्यांच्या इतकी उत्तम कार्यकर्ती नव्हती, असं ते अभिमानानं नमूद करतात. दिल्लीत त्यांची चौकशी करताना अनुराधा गांधींबद्दल पोलिसांनी विचारलं तेव्हा कोबाड गांधींच्या डोळ्यात अश्रू आले आणि तेव्हा ते पोलीसही नरमले आणि त्यांनी त्यापुढे कधी अनुराधा गांधींबद्दल विचारलं नाही, असं ते सांगतात.
य पुस्तकात त्यांनी त्यांच्या कुंटुंबाबद्दल लिहिलंय, डून स्कूलमधील आठवणी सांगितल्यात, लंडनमधील शिक्षणाबद्दल लिहिलंय, तिथून आल्यानंतर मायानगरमधील झोपडपट्टीतल्या कामाबद्दल लिहिलंय, दलित चळवळींबद्दल लिहिलंय, नक्षलवादी-माओवादी चळवळींबद्दल लिहिलंय, भारतातील डाव्यांबद्दल लिहिलंय, भारतातील तुरुंग-पोलीस-न्याय व्यवस्थेबद्दल लिहिलंय, भारताच्या आर्थिक वाटचालीबद्दल लिहिलंय, स्वातंत्र्याच्या संकल्पनेबद्दल लिहिलंय.... तुम्ही आवाक् व्हाल इतकं सारं या 300 पानांमध्ये कोबाड गांधी यांनी एका उत्तम फ्लोमध्ये लिहिलंय.
या माणसाने दहा-वीस खंड लिहिले पाहिजेत, असं वाटून जातं, इतकं काही सांगण्यासारखं आहे त्यांच्याकडे. पण त्यांनी आवरत घेऊन, स्पेसिफिक आणि फ्लोनुसार लिहिण्यावर भर दिलाय.
शेवटी ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे प्रसंग सांगतात, तेव्हा ते वाचून डोळ्यात पाणी येतं. ते म्हणतात, शोषित-वंचित-कामगार-मजुरांसाठी काम करण्यात 40 वर्षे घालवली, त्याची शिक्षा की काय म्हणून मला 10 वर्षे तुरुंगात राहावं लागलं... आता बाहेर आलो, तर राहण्यासाठी स्वत:चं छत सुद्धा नाही. आधार कार्ड किंवा कुठलेही सरकारी कागदपत्र नाही.
हे वाचून डोळे पाणावतात. आपण किती निष्ठूर आहोत, याची जाणीव होते आणि मन खात राहतं. ज्यांच्यासाठी त्यांनी ऐश्योआरामी आयुष्य त्यागलं, त्या लोकांनी तरी किती त्यांना आधार दिला? अर्थात, हा प्रश्न कोबाड गांधी विचारत नाहीत. ते सांगतात, कधीही न ओळखणारे बरेच जण या काळात मदतीसाठी पुढे आले. फली नरीमन, रेबेका जॉन यांच्यापासून देशातील मोठमोठे वकील त्यांच्यासाठी उभे राहिले. आर्थिक मदतीसाठी डून स्कूलमधले वर्गमित्र पुढे आले. असे बरेच चांगले आणि सकारात्मक क्षण नोंदवून ते पुढे जाऊ पाहतात.
कोबाड गांधी आता वांद्रे येथील त्यांच्या बहिणीकडे राहतात. या पुस्तकात पत्नी अनुराधा गांधी यांचा जितक्या प्रेम आणि आदराने उल्लेख येतो तितकाच त्यांच्या बहिणीचा येतो. बहिणीने दिलेली साथ ते विसरत नाहीत. आणि आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्यांच्या बहिणीच्याच छताचा आसरा कोबाड गांधींना आहे.
शोषित-वंचित-कामगारांसाठी जगणं पणाला लावलेल्या कोबाड गांधींचं आयुष्य संपत आलं, पण त्यांच्यावरील खटले संपले नाहीत. ते सुरूच आहेत. कोरोनामुळे ते थांबलेत, इतकेच. वय मात्र आता त्यांच्या हातात नाही. जुन्या आठवणींमधून ते भावनिक होतात. इतकं सोसूनही अजूनही न्याय्यहक्कांसाठीची त्यांच्यातली तळमळ शब्दा-शब्दांमधून दिसते आणि ते वाचून आपण निशब्द होतो.
...
नामदेव काटकर
संपर्क : namdev.katkar@gmail.com



Comments
Post a Comment