जीवनगाणं
कविता केवळ कवीची कलाकृती नसते, ते असतं कवीचं स्टेटमेंट - स्वत:च्या जगण्यावरचं स्टेटमेंट, समाजाच्या वागवण्यावरचं स्टेटमेंट आणि न वागण्यावरचंही! हे स्टेटमेंट किती धारदार असू शकतं, हे कवीच्या अनुभविश्वाचा परीघ किती रुंदावलेला असतो, त्यावर अवलंबून असतं.
नामदेव कोळी यांचा 'काळोखाच्या कविता' हा संग्रह मला 'स्टेटमेंट' वाटला. आपल्या वावरण्याभोवतीचा बरा-वाईट-कडू-गोड भोवताल त्यांनी कवितेतून मांडलाय, सांगण्याचा प्रयत्न केलाय.
यातल्या कवितांमध्ये जगण्यातल्या नोंदींसह समजूतदारपणाही दिसतो. सुख-दु:खाला त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करून आपलसं करण्याचा समजूतदारपणा.
वसलेल्या प्रत्येक ठिकाणाचे उसवलेले काही निवडक धागे नेमकेपणाने शब्दांद्वारे जोडण्याचा प्रयत्न म्हणजे या कविता. ना कुठे कमी, ना कुठे जास्त. ना केवळ दोष, ना केवळ कौतुकांचा सोहळा. जगणं आहे तसं लिहिलेलं हे 'जीवनगाणं' आहे. हो, जीवनगाणंच. माय-बापाचं, बहीण-बायांचं, शेत-शिवाराचं, शहर-गावाचं नि या सगळ्यांच्या गूढ-अपरिहार्य ओढीचं हे जीवनगाणं.
कविता कुठल्याच इथं उद्धृत करत नाही. त्या संग्रहातूनच वाचलेल्या अधिक बऱ्या. पण न राहून मायेच्या जगण्याची कविता मात्र इथं देतोच. मायेचं जगणं सांगताना एका कवितेत नामदेव कोळी म्हणतात,
"दिवसभर
राबून
मध्यरात्री
तुटक्या
खाटेवर
माय घेते विश्रांती कण्हत कण्हत
तिचं मन मात्र निघून जातं हळूवार
सरणापर्यंत
सुखाचं मरण शोधत"
हे वास्तव आहे गावकुसातलं. 'सुखाची झोप यावी अन् सुखाचं मरण' या राबणाऱ्या बाई-माणसांच्या अबोल भावनांना कवीनं दिलाय कवितेचा आवाज. पण तेव्हा ते हेही सांगतात की, मायेलाच कविता येत असती, तर तिनेच हे सांगितलं असतं. कारण माय जेव्हा सटवीच्या नावानं बोटं मोडायची, तेव्हा तिच्या त्या कृतीत तिने कधीही शब्दात मांडू न शकलेलं एक स्टेटमेंटच तर होतं!
मायबाप, बालपण-गावपण, शेती-मजुरी-पाटीलकी, गुरं-ढोरं, शेत-शिवार... असा सारा 'गणगोत' मांडल्यानंतर कवी वळतो पुढच्या 'प्रवासाला'. सगळ्यात अवघड प्रवासाला. शहराच्या दिशेनं. पण शहरातल्या जगण्याची अवस्था सांगणारी कविता म्हणते,
"स्वप्नातही
गगनचुंबी इमारती
लोकलची गर्दी
धावपळ गोंधळ गोंगाट.
मनात रुतून बसलेल्या
गावाची आता फिकीर वाटायला लागलीय"
अरविंद जगताप म्हणतात तसं, साला आपण ना इकडचे, ना तिकडचे राहिलो. शहरात असताना आपण गावातले आणि गावात असताना आपण शहरातले असतो. असं अस्वस्थ जगणं जगतोय आपण. पोटापाण्यासाठी स्थलांतरित झाल्याच्या नावाखाली!
नामदेव कोळींच्या या कवितांमध्ये स्थलांतरिततेची ही गुंफण-नि-कुंपण आहेच. पण 'गावाची आता फिकीर वाटायला लागलीय' या त्यांच्या ओळीत ती अधिक ठळक दिसते.
शिवाय, या कवितासंग्रहात स्थलांतराची एक अदृश्य नोंद आहे. ती दिसणार नाही कदाचित तुम्हाला कवितेच्या एखाद्या ओळीत, कडव्यात किंवा मथळ्यात. ती आहे कविताच्या तळाशी - नदीच्या तळाशी शांतपणे वाहणारा प्रवाह असतो तशी आणि शब्दश: सुद्धा आहे.
यातला शांतपणे वाहणाऱ्या स्थलांतराच्या नोंदीचा प्रवाह आपण शोधायचा आपल्या अनुभवविश्वाला अनुसरून, तर शब्दश: स्थलांतरच्या नोंदी सापडतात 'कडगाव, जळगाव, मुंबई' नावांच्या स्थळांमधून - कवितेच्या तळाशी! कवितेच्या स्थितीची पार्श्वभूमी, कथा-व्यथा आणि 'कवितेचं जगणं' दिसतं या स्थलांतरांच्या नोंदींवरून.
सोसलेल्या-भोगलेल्या व्यथा आहेतच. शिवाय, अगदी कवीच्याच शब्दात सांगायचं, तर 'अगणित प्रश्नांचं मोहोळ, उत्तरांना घट्ट चिकटलेला कभिन्न काळोख' सुद्धा आहे. पण 'मी उजेडाची एक तिरीप' म्हणत एक आशावादही कवीच्या मनाशी घट्ट रुजलेला आहे - या आशावादाला अस्खलित लख्खपणा येवो आणि जगण्यातल्या आणखी धाग्या-दोऱ्यांची अशीच कविता विणत जावो, याच नामदेव कोळी यांना सदिच्छा.
...
नामदेव काटकर
संपर्क : namdev.katkar@gmail.com
Comments
Post a Comment