तो प्रवास सुंदर होता...
आपण ज्यांना 'कुसुमाग्रज' म्हणून ओळखतो त्या विष्णू वामन शिरवाडकरांचं मूळ नाव 'गजानन'. केवळ गजानन नाही, तर गजानन रंगनाथ शिरवाडकर.
तुमचा गोंधळ होऊ शकतो. पण हे खरंय. रंगनाथ शिरवडकारांचे थोरले बंधू वामनराव शिरवाडकर निधन पावले, तेव्हा त्यांच्या पत्नीने रंगनाथ शिरवाडकर या धाकट्या दिराच्या मुलाला म्हणजे गजाननला दत्तक घेतले आणि त्याचं नाव ठेवलं 'विष्णू'.
हा विष्णू म्हणजे 'विष्णू वामन शिरवाडकर' म्हणजे 'ज्ञानपीठ' विजेते साहित्यिक 'कुसुमाग्रज'.
काही वर्षांपूर्वी के. रं. शिरवाडकर यांचे 'आपले विचारविश्व' नावाचे पुस्तक वाचत असताना, त्यांनी कुसुमाग्रजांचा उल्लेख 'सख्खा भाऊ' म्हणून केल्याचं वाचलं होतं. तेव्हापासूनच खरंतर कुतुहल होतं की, सख्खा भाऊ मग वडिलांची नावं वेगळी का? पण ते कुतुहल उलगडण्याचा मधल्या काळात काही प्रयत्न केला नाही. पण आता हे पुस्तक हाती लागलं - 'तो प्रवास सुंदर होता' आणि ते कुतुहलही उलगडलं.
के. रं. शिरवाडकरांनी (केरं) हे चरित्र लिहिलंय. याला केवळ चरित्र असं पुस्तकीय बोलून थांबावं लागणार नाही. या आठवणींच्या ऐवजातून केरंनी त्यांच्या थोरल्या भावाचे - कुसुमाग्रजांचे - वैयक्तिक आणि साहित्यिक आयुष्य उलगडलंय. काही ठिकाणी तेही आचंबित होतात आणि निशब्द होतात, पण ते घरातलेच एक असल्यानं शक्य तितके कुसुमाग्रज आपल्याला दाखवू पाहतात.
आचंबित होतात असं मी का म्हटलं, तर केरं म्हणतात, कुसुमाग्रज वैयक्तिक आयुष्यात तसे प्रसन्नपणे, शांतपणे, निरपेक्षतेने, समाधानाने जगत होते. मात्र, त्यांच्या कवितेतल्या काही ओळी मनात अनेक प्रश्न उपस्थित करतात. या ओळींचा अर्थ केरंनाही सापडत नाही. कुसुमाग्रजांच्या मनात नेमकी काय तगमग सुरू होती, हे कळत नाही.
त्यातल्या दोन कविता अशा :
१.
"तुम्ही जेव्हा
माझ्या कवितेशी बोलता
तेव्हा माझ्याशी बोलू नका
कारण माझ्या कवितेत
मी असेन बराचसा
बहुधा"
एकीकडे कुसुमाग्रज असं म्हणतात. आणि त्याचवेळी दुसरीकडे लिहितात,
२.
"पण तेव्हादेखील
आणि त्यानंतर कधीही
त्याला कळणार नाही
माझ्या या आकाशाने
काय भोगले
काय सोसले
काय अनुभवले"
केरं हे कुसुमाग्रजांच्या कुटुंबातील. मात्र, तेही इथं निरुत्तरच होतात. पण तरीही ते कुटुंबातले असल्याने कुसुमाग्रजांच्या या मनाच्या अवस्थेचा मागोवा या पुस्तकातून घेतात. जाणीवपूर्वक नाही, पण अप्रत्यक्षपणे आपल्याला वाचताना ते लक्षात येतं.
'गजानन - विष्णू - वि. वा. शिरवाडकर - कुसुमाग्रज - तात्या - तात्यासाहेब' -- हा प्रवास केरंनी या पुस्तकात मांडलाय. कुटुंबातला गजानन, विष्णू आणि तात्या, मग साहित्यातील कुसुमाग्रज आणि महाराष्ट्राचे लाडके तात्यासाहेब, असा संपूर्ण प्रवास या पुस्तकात आहे.
कुसुमाग्रजांच्या कविता, त्या कुठे आणि कशा अवस्थेत (मनाच्या) लिहिलेल्या? त्यांचं वाचन, लेखन यांसोबतच आजूबाजूच्या जगाबाबतचं निरीक्षण आणि मग ते त्यांच्या कवितेत कसं उमटत गेलं. त्या कवितांचे अर्थ काय, असा सारा पट या पुस्तकात आहे.
केरंसारख्या सिद्धहस्त लेखकानेच आपल्या थोरल्या भावावर म्हणजेच महाराष्ट्राच्या लाडक्या तात्यासाहेबांवर - कुसुमाग्रजांवर - हे पुस्तक लिहिल्याने या पुस्तकाला वेगळं महत्त्व आहे.
या पुस्तकाचे शिर्षक - 'तो प्रवास सुंदर होता' - हे कुसुमाग्रजांच्या कवितेतूनच घेतलेलं आहे. त्या कवितेले दोन कडवे इथं देतो :
"आकाशतळी फुललेली
मातीतील एक कहाणी
क्षण मावळतानाचा येता
डोळ्यांत कशाला पाणी?
तो प्रवास सुंदर होता
आधार गतीला धरती
तोजोमय नक्षत्रांचे
आश्वासन माथ्यावरती"
आयुष्याच्या शेवटच्या काळात कुसुमाग्रजांनी ही कविता लिहिलीय. त्यातील अर्थातून आपल्याला लक्षातही येतं. पण केरंनी हेही समजावून सांगितलंय की, कुसुमाग्रजांच्या कविता वयानुसार कशा बदलत गेल्या. शेवटच्या काळातील कवितांमधून तर ते प्रकर्षानं जाणवतं.
कुसुमाग्रजांचे आपण एरवी कधीही पाहू शकत नसलेले फोटो, एरवी कुणी सांगू शकणार नाही अशा आठवणी असं सगळं यात आहे. या पुस्तकावर मला आस्वादक म्हणूनही फार लिहिता येत नाहीय. पण पुस्तकाची ओळख करून द्यावी वाटली, म्हणून हा वरील लेखनप्रपंच.
या पोस्टचा शेवटही पुस्तकाच्या शेवटी कुसुमाग्रजांच्या उद्धृत केलेल्या कवितेनेच करेन.
"जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातिल
गीतांमधुनी राहिन मी"
किती खरंय हे... आजही गीतांमधून कुसुमाग्रज आपल्यात आहेत!
...
नामदेव काटकर
संपर्क : namdev.katkar@gmail.com
Comments
Post a Comment